शिंदे गटाचा गुवाहाटी दौऱ्यावर जाण्याचा मुहूर्त ठरला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून समोर येत होत्या. मात्र, शिंदे गटाला पत्रकार देखील याबाबत प्रश्न विचारत होते. परंतु, तारीख ठरली नाही असे वारंवार त्याच्याकडून सांगण्यात येत होते. आता शिंदे गटाकडून गुवाहाटीला जाण्याची तारीख ठरली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या गुवाहाटी दौऱ्यावर शिंदे गटातील सर्व नेते जाणार असल्याचे समजत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे सर्व आमदार हे येत्या 26-27 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे सर्व आमदार-मंत्री गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. कामाख्या देवीच्या दर्शनासाठीच ते पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती समोर आलीय.
दौऱ्यानंतर होणार शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार?
शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अद्याप प्रलंबित आहे. या मंत्रीमंडळ विस्ताराकडे शिंदे गटातील अनेक नाराज आमदारांचे लक्ष आहे. त्यामुळे कोणाची नाराजी दूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हिवाळी अधिवेशना आधी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल असे संकेत काही मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे कदाचित याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिंदे गट गुवाहाटीला जात असल्याची चर्चा आहे. चर्चा झाल्यावर हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.