शिंदे गट दादरमध्ये उभारणार प्रतिसेनाभवन
मुंबई : राज्यात मागील काही दिवसात अभूतपूर्व गोंधळ घडला. शिवसेनेतील बंडामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. या सर्व गोंधळा दरम्यान शिवसेना नक्की कोणाची हा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता कोर्टाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत शिंदे गट आणि शिवसेना आहे. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप-प्रत्यारोप यावेळी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. शिवसेनेचं सेना भवन हे कार्यालय दादरमध्ये कार्यालय आहे. दादर मध्ये असणाऱ्या कार्यालयाच्या परिसरात आता शिंदे गट प्रतिसेना भवन उभारणार आहे. या गोष्टीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
काय म्हणाले शिंदे गटाचे सरवणकर ?
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, मुंबई शहरात शिंदे साहेबांचे एक कार्यालय असणार हे नश्चित आहे. मुंबईतील ज्या समस्या, तसेच मुंबईकरांना जर शिंदे साहेबांना भेटायचं असेल तर एखादं मध्यवर्ती कार्यालय असावं अशा प्रकारचं त्यांच्या मनात आहे. तसेच हे कार्यालय दादरमध्ये असावं अशीही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे दादरमध्ये शिंदे साहेबांचं एखादं कार्यालय निश्चित होईल. प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय होणार आहे. तसेच हे मुंबई जिल्ह्यातील कार्यालय असेल. इतकेच नाही तर मुंबईतील प्रत्येक प्रभागात अशाच प्रकारचं कार्यालय होणार आहे असंही सदा सरवणकर म्हणाले.