ठरलं! शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सुचवली 'ही' तीन चिन्हे
मुंबई : शिवेसनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे दोन्हीही गटांना आजा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जारी करून दोघांनाही पक्षांसाठी सोमवारपर्यंत तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यास सांगितले होते. यानुसार शिंदे गटाची बैठकीत तीन चिन्हे निवडणुक आयोगाला सुचवली आहेत.
पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी रविवारी रात्री शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन चिन्हांवर चर्चा झाल्याचे समजत आहे. यानंतर शिंदे गटाचा उगवता सूर्य, त्रिशुळ आणि गदा ही तीन चिन्हे सुचविण्यात आली आहेत. यावर आजच निवडणुक आयोग निर्णय घेणार आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल तात्पुरता स्वरुपाचा असून त्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
तर, पक्षाच्या नावावरुन ठाकरे-शिंदे गटात पुन्हा एकदा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेने पर्याय म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव सुचविले आहे. तर, शिंदे गटानेही शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय सुचविले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये ठाकरे गटाने नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' ही पहिली पसंती, तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही दुसरी पसंती असल्याचे समजत आहे. तर, चिन्हासाठी प्रथम त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन चिन्ह सुचविले आहेत. परंतु, ही तिन्हीही चिन्हे निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत. यामुळे शिवसेनेला कोणते चिन्ह मिळाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.