'बाप जैसा बेटा,भरलो जल्दी लोटा' त्या क्लिपवरून शिंदे गटाची खैरे पिता- पुत्रांवर टीका
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आता औरंगाबादमधून वेगळी बातमी समोर आली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मुलगा, युवासेना पदाधिकारी ऋषिकेश खैरे यांची एक कथित ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देतो म्हणून एका व्यक्तीकडून दोन लाख रुपये घेतल्याचा उलगडा या ऑडिओ क्लीपमधून होत आहे. बदली न केल्यामुळे माझे पैसे परत करा, असा तगादा संबंधित व्यक्ती करत असल्याचे यातून स्पष्ट होते. त्यावरच आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी खैरे पिता- पुत्रांवर टीका केली आहे.
काय आहे शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांची टीका?
चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे यांच्या कथित ऑडिओ क्लीपवर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी फेसबुकवरून पिता- पुत्रांवर निशाणा साधला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, बाप जैसा बेटा,भरलो जल्दी लोटा....! एखाद्या कार्यकर्त्यांनी जर चार चाकी वाहन घेतले किंवा चांगले मोठे घर घेतलं तर त्याच्याकडे संशयाने पाहणारे चंद्रकांत खैरे आता यावर काय उत्तर देतील? असा सवाल केला आहे. पुढे ते म्हणाले की, यावरून एक गोष्ट लक्षात आली जे आडात आहे तेच पोहऱ्यात आले युवा सैनिक घडवण्याची जबाबदारी असणारा पदाधिकारी खऱ्या अर्थाने युवकांना काय आदर्श देणार हा एक चर्चेचा विषय ठरतो. असे देखील ते यावेळी म्हणाले आहे.