शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान
काल केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मिळाला. आयोगाचा या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला आहे. हे सर्व होत असताना शिंदे गट शिवसेना भवनावरही दावा करणार का? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आता यावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यााबाबत एक मोठं विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले शिरसाट?
शिवसेना भवन ही केवळ इमारत नाही, तर आमच्यासाठी मंदिर आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना भवनावर कधीही दावा करणार नाही. ठाकरे गटाच्या नेत्याच्या मनातले विचार अत्यंत चुकीचे आहे. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे. जेव्हा-जेव्हाही आम्ही शिवसेना भवनाजवळून जाऊ, तेव्हा तेव्हा शिवसेना भवनसमोर आम्ही नतमस्तक होऊ. आमच्या अनेक आठवणी शिवसेना भवनाशी जुळलेल्या आहेत. बाळासाहेबांबरोबर अनेक बैठका आमच्या त्या ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर कधीही दावा सांगणार नाही. असे शिरसाट म्हणाले आहे.