अदित्य ठाकरेंच्या 'त्या' आव्हानाला गायकवाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, आपल्या औकातीपेक्षा...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. त्यातच काल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला होता. आता यावरच शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
संजय गायकवाड यांनी काय दिले प्रत्युत्तर?
आदित्य ठाकरेंच्या प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खोचक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी आपली कुवत पाहून, ताकद पाहून, आपण कुणाला आव्हान देतोय? हे पाहावे. राज्यातील प्रश्न सोडवण्याचे, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याचे, राज्याला सिंचन प्रकल्प देण्याचे, राज्यात उद्योगधंदे आणून बेरोजगारांना रोजगार द्यायचे, अशी आव्हाने एकनाथ शिंदेंनी स्वीकारली आहेत. असे गायकवाड यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, संजय राऊत म्हणत असतील की, ३२ वर्षाच्या पोरानं आव्हान दिल. तर मला वाटते की, ३२ वर्षे हे लग्नासाठी उलटून गेलेले वय आहे. त्यामुळे त्यांना सल्ला आहे की, त्यांनी चांगली पोरगी बघून लग्न करावं. चांगला संसार करावा. विनाकारण आपल्या औकातीपेक्षा जास्त बोलू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या मतदारसंघात पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे. असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.