Congress : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, एकदम ओक्के, पचास खोके ओके'
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेतून (Shivsena) अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले. यातील बंडखोर आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांचा एक डायलॉग चांगलाच फेमस झाला होता. या डायलॉगचा फिव्हर आता कॉंग्रेस (Congress) आमदारांनाही चढला असल्याचे दिसत आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील हे गुवाहटीला गेल्यानंतर त्यांना फोन करुन कार्यकर्ते त्यांची प्रकृतीची विचारपूस करत होते. तेव्हा त्यांनी मी सध्या गुवाहाटीत आहे असे म्हणून काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांस सांगितले. यानंतर त्या डायलॉगची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. असाच डायलॉग आता कॉंग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी मारला आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल.. एकदम ओक्के....पचास खोके ओके, अशी टीकाच त्यांनी शिंदे गटावर केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्याआधी संजय राऊतांनी शिंदे गटावर टीकेची तोफच डागली होती. बंडखोर आमदारांना जबरदस्तीने गुवाहटीत ठेवल्याची टीका त्यांनी केली होती. तसेच, शिंदे गटाला 50-50 कोटी रुपये वाटल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. तर, आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी शिंदे गटावर टीका केली.