शिंदे गटाच्या मेळाव्याला आलेल्या लोकांनाच माहित नाही की हा कोणता कार्यक्रम ?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होत आहे. यादरम्यान शिंदे गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार असून आमचीच शिवसेना खरी असल्याचं दाखवण्याचा यावेळी प्रयत्न होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमविण्याचे शिंदे गटाकडून प्रयत्न आहे. बीकेसी येथे राज्यभरातून कार्यकर्ते जमले असून चार तासांआधीच बीकेसी मैदान भरले होते. परंतु, मेळाव्याला आलेल्या लोकांनाच हा कोणता कार्यक्रम हेच माहित नसल्याचे समोर येत आहे.
दसरा मेळाव्याचा निमित्ताने शिंदे गटाने 3 हजाराहून अधिक एसटीचे बुकींग केले आहे. तर, खासगी बसेसचेही मोठ्या प्रमाणात बुकींग करण्यात आले होते. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमा झाली आहे., मात्र जी गर्दी जमा झाली आहे त्याच लोकांना माहीत नाही की आपण या कार्यक्रमात कशासाठी आलो आहोत आणि हा कोणता कार्यक्रम आहे. एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना दिलेले टार्गेट त्यांनी पूर्ण केले. मात्र, भोळ्या भाबड्या नागरिकांना हेच माहित नाही की पुढे सुरू काय आहे? आता हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे.
दरम्यान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेना व शिंदे गटाचे समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. आता कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी जमतेय हे रात्री सभेवेळी कळेल. पण त्याआधीच्या एका लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरचढ ठरले आहेत असं दिसून येत आहे. तर, ट्विटरवर सकाळपासूनच एकनाथ शिंदे शिवसेना @ बीकेसी, चला बीकेसी हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत.