शिरसाटांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही का? भुमरेंचे सूचक वक्तव्य
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच विद्यमान शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ सुद्धा चर्चेत राहिला, त्या मंत्रिमंडळावर अनेक शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याच विषयावरून आता संजय शिरसाट यांच्याबद्दल रोहया आणि औरंगाबाद पालकमंत्री संदीपान भुमरे सूचक विधान केले आहे. पालकमंत्री भुमरे यांनी गुरुवारी स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाले भुमरे?
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना भुमरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातला असल्यामुळे मंत्री, पालकमंत्री अशी जबाबदारी मिळाली. त्यावर तुम्ही विश्वासातले आहेत पण मंत्रीपदासाठी वाट पाहत असलेले संजय शिरसाट यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर सारवासारव करताना भुमरे म्हणाले, आम्ही सगळे ४० आमदार मुख्यमंत्र्याच्या विश्वासातले आहोत. त्यांच्यावर आमचा विश्वास होता म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो, पण सर्वांनाच मंत्री करता येत नाही. संजय शिरसाट यांच्यावर देखील एकनाथ शिंदे यांचा विश्वास आहे. मात्र सध्या ते वेटींगवर आहेत, त्यांना देखील मंत्रीपद नक्की मिळेल, असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला.