आधी माईक खेचला, नंतर चिठ्ठी आता थेट स्टेजवरच...; शिंदे-फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात अभूतपूर्व नाट्यमय घडामोडी घडल्या. व शिंदे-फडणवीसांचे सरकार अस्तित्वात आले. व सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. यानंतर शिंदे-फडणवीस यांनी अनेक पत्रकार परिषद घेतल्या. परंतु, पत्रकार परिषद त्यांच्या घोषणांऐवजी नेहमीच वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला आहे. कधी माईक खेचणे तर कधी चिठ्ठी लिहून दिल्याने शिंदे-फडणवीस टीकेचे धनी बनले होते. असाच प्रसंग एका कार्यक्रमात घडला आहे. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांनी आज एका वृत्तवाहिनीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. यात नानांनी शिंदे-फडणवीस यांना विविध प्रश्न विचारले. यात नाना पाटेककरांनी, जनमताचा कौल, वाढती लोकसंख्या, शेतकरी आत्महत्या या सारख्या मुद्द्यांवरून प्रश्न विचारले. त्याला फडणवीस-शिंदे यांनी उत्तरंही दिली. या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना थांबवत स्वतः उत्तर दिले. याचाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांना फक्त शो-पीस म्हणून कार्यक्रमाला नेता का, असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे.
काय होते व्हिडीओत?
मुंबईतील खड्डयांचा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शिंदे म्हणाले, 50 किमी कॉंक्रीटचे करणार असल्याचे सांगितले आहे. पुढील दोन वर्षात मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही. सर्व कॉंक्रीटचे रस्ते होतील, असे सांगितले. यावर नाना पाटेकर यांनी ज्यांना टेंडर देणार आहात अथवा कॉन्ट्रक्टर आहेत. पाच वर्षांसाठी त्यांच्याकडून लिहून घ्या, अशी मागणी केली. याबद्दल मुख्यमंत्री आम्ही तीही अट टाकली आहे. असे म्हणत असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबविले. व नाना पाटेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सुरुवात केली. खूप चांगला प्रश्न विचारला आहे. महापालिकेत स्थानिक कॉन्ट्रक्टर पात्र होत होते. मात्र, टाटा आणि एल अॅन्ड टी सारखे कॉन्ट्रक्टर पात्र होत नाही. परंतु, आता मुख्यमंत्र्यांनी टाटा आणि एल अॅन्ड टी सारख्यांना पात्र केले आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. यानंतर मोठ्या कंपनी काम करतील आणि वेळेत काम पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.