शिंदे-फडणवीसांमध्ये कुरबुरी? पोलिसांच्या बदल्या आणि बढतींना मुहुर्त मिळेना
चंद्रशेखर भांगे | पुणे : राज्य पोलीस दलातील अप्पर पोलीस महासंचालकासह पोलीस अधीक्षक आणि उपयुक्त यांच्या बदल्या लांबत असल्याने पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घालमेल सध्या सुरू आहे. राज्याच्या गृह विभागाचे सचिव गेल्या अनेक दिवसापासून या बदल्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी-उपमुख्यमंत्री यांना पाठपुरावा करत असताना सुद्धा अद्याप बदल्या झालेल्या नाहीत. या बदल्यांबाबत शिंदे-फडणवीसांमध्ये कुरबुरी सुरु असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या दर दोन ते पाच वर्षांनी बदल्या होत असतात. अनेक वेळा काही कारणामुळे वर्षभरानंतरही बदल्या करण्यात येतात. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या यंदा मार्च एप्रिल महिन्यात होणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या लांबल्या. तसेच बढती देखील झाली नाही. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्याने बदली प्रकरण आणखीनच रखडले. यानंतर दिवाळीपुर्वी बदल्या होणार असल्याच्या शक्यता होती. परंतु, आता दिवाळीही काही दिवसांवरच आली असून अद्याप कोणतीही सूचना निघालेली नाही. या बदल्या आता तब्बल चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उशिरा लांबल्याने अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सध्या गृहमंत्री पदाचा कार्यभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. परंतु, बदल्यांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचात एकमत होत नसल्याचे समजत आहे. तसेच, नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील 40 आमदारांनी अनेक पसंतींच्या अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात अधिक्षक म्हणून नियुक्ती करा म्हणून हट्ट धरल्याने या बदल्यांना उशिरा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे फडणवीस सरकार आणि शिंदे सरकारमध्ये वाद होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.