कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक हजारच मते मिळाल्यानंतर शशी थरूर म्हणाले...
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत खर्गेंनी शशी थरुर यांचा दारुण पराभव केला आहे. यानंतर शशी थरुर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शशी थरुर यांनी पराभव स्वीकारत मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले आहे.
शशी थरुर म्हणाले की, अंतिम निकाल खर्गे यांच्या बाजूने लागला आहे. काँग्रेसच्या निवडणुकीत विजयाबद्दल मी खर्गेंचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. काँग्रेसचे अध्यक्ष होणे हा मोठा सन्मान व जबाबदारी आहे. तसेच 1000 साथीदार एकत्र असणे हा देखील सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
अत्यंत कठीण परिस्थितीत पक्षाची ताकद आणि नेतृत्व टिकवून ठेवल्याबद्दल काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सर्वजण ऋणी असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यात योगदान दिल्याबद्दल मी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे आभार मानतो, अशा भावना शशी थरुर यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये 9385 जणांनी मतदान केले होते. त्यापैकी मल्लिकार्जुन खर्गे यांना 7,897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना 1,072 मते मिळाली. तर, यातील 416 मते बाद झाली.