पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचा हात, भातखळकरांनी केली गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
राज्यात सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मागील ५० दिवसांपासून कोठडीत आहे. कालच न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत पुन्हा वाढ केली आहे. अशातच आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ज्या प्रकरणात संजय राऊत यांना कोठडी सुनावण्यात आलेल्या प्रकरणात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची महत्वाची भूमिका असल्याचा आरोप करत राज्याच्या गृहमंत्र्यांकडे त्याबाबत चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या चौकशीसाठी भातखळकरांनी गृहमंत्र्यांकडे पाठवलेल्या पत्रात लिहले की, मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआाशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी पत्रात केली आहे.
या पत्रात स्पष्ट सांगितले की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत.मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी. अशी मागणी आ. भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.