महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचा दावा; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले...
मुंबई : सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. यावरुन शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस व मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या विधानाला मोदी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
शरद पवार म्हणाले की, कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी मागणी केली. आम्ही पण बेळगाव कारवारची मागणी करतो. ही तर जुनी मागणी आहे. आमच्या मागणीत सातत्य आहे. ते सांगतात, काही गावे हवी आहेत. काही न करता मागणी करता हे योग्य नाही. तिथे भाजपचे राज्य आहे. आणि राज्यातही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे कसेही वागा काहीही मागणी करा. त्याला ते जबाबदार आहेत तसे या देशात सत्तेत बसलेले देखील आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे.
तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावरुन शरद पवार यांनी आज एकनाथ शिंदेंना टोला लगाविला. सरकार स्थिर राहील का, या प्रश्नावर ते म्हणाले, मी ज्योतिषी नाही. माझं विश्वास नाही. त्यामुळे मी कुठे हात दाखवायला जात नाही. आसाममध्ये गेले आता परत जात आहेत. कार्यक्रम रद्द करून सिन्नरला हात दाखवला हे आम्हाला नवीन आहे. पुरोगामी राज्य असा राज्याचा लौकिक आहे हे नवीन पाहायला मिळते आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे. असे त्यांनी ट्विट केलं आहे. तसेच ते म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं बोम्मई यांनी म्हटले आहे.