मी राजीनामा देतो म्हणालो याचे कारण...; अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्युत्तर
पुणे : अजित पवार यांनी कर्जतमधील शिबिरातून शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यावर आज पहिल्यांदाच शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे. त्यांना उत्तर काय द्यायचे. त्यांनी पक्ष बदलला, निर्णय घेतला. काल जे बोलले त्यात सत्य किती आहे, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.
शरद पवार म्हणाले की, त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदा कळल्या. चर्चा झाली ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते ते योग्य नाही. लोकांना आम्ही जी मत मागितली ती भाजपसोबत जाण्याची नव्हती. शिवसेना सोबत जाण्याची आमची भूमिका वेगळी होती. आजही आमची भूमिका भाजपविरोधी आहे. आमची भूमिका स्पष्ट होती की भाजप बरोबर जायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजीनामा घडामोडींवर आरोप करत टीका केली होती. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मी राजीनामा देतो म्हणालो याचे कारण भाजप सोबत जायचे नव्हते. मी सर्वसामान्य जनतेबरोबर गेली ६० वर्ष काम करतो आहे. ते टीका करतायेत ते किती योग्य आहे आणि कोण करतंय हे पण महत्वाचे आहे. त्यांनी राजकीय निर्णय घेतला हा त्यांचा निर्णय आहे. पण तक्रार एकच आहे की निवडणूक लढताना त्यांनी राष्ट्रवादीसाठी मत मागितली आणि आता भाजपमध्ये गेले, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तर, मी वाट बघतोय प्रफुल पटेल यांनी माझावर पुस्तक लिहावे. लोक पक्ष सोडून का जातात त्यांनी पुस्तक लिहावं. बंगल्याचे काही मजले ईडीने ताब्यात का घेतले यावर पुस्तक लिहावं, असा खोचक टोला शरद पवारांनी पटेलांना लगावला आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांची बैठक बोलावली होती. महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे तर काही भागात अतिवृष्टी आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे पंचनामे करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. हे प्रश्न विधानसभेत मांडले जातील पण महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी ही चर्चा बैठकीत झाली, असे शरद पवारांनी सांगितले.