सामनातील 'त्या' टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मविआत..
सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते असले तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा थेट निशाणा ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून शरद पवारांवर साधला आहे. यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
हे खरं आहे की राजीनाम्याच्या निर्णयामुळे पक्षातील नेते, हितचिंतक अस्वस्थ होते. त्या सर्वांच्या आग्रहखातर माझा निर्णय मला बदलावा लागला. पण, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणजे पक्ष संघटनेचा काम सोडलं, असा त्यांचा गैरसमज होता. पण, तो गैरसमज आज दूर होतोय याचा आनंद आहे. कामाची सुरुवात करणारच होतो आणि माझी एक पद्धत आहे त्यानुसार मी कामाची सुरुवात करतो. सोलापूर किंवा तुळजापुरातून मी माझ्या कामाची सुरुवात करतो, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
तर, मी काही सामना अग्रलेख वाचलेला नाही. सामना किंवा सामनाचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्रित काम करतो. एकत्रित काम करत असताना पूर्ण माहिती घेऊनच त्यावर भाष्य करणे योग्य राहील. नाहीतर गैरसमज होतात. पण, मला खात्री आहे त्यांची भूमिका ऐक्याला पोषक अशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत सर्वकाही ठीक आहे काळजी करू नका, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नितेश कुमार शरद पवारांची भेट घेणार आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, मला मेसेज मिळाला आहे की ते अकरा तारखेला येणार आहेत, भेट होण्याची शक्यता आहे. मला नक्की माहित नाही की त्यांचा प्रस्ताव काय आहे, पण ते भेटणार आहेत. पण, सगळ्यांचा एकच दृष्टिकोन आहे की काही झालं तरी या पर्याय द्यायचा आहे. यासाठी जे कोणी काम करत असतील मग ते नितीश कुमार असो की ममताजी असो या सर्वांना साथ देण्याची भूमिका माझी असेल, असे त्यांनी सांगितले