कळवा रुग्णालयातील घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा अनागोंदी कारभार समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 दिवसांत 22 रुग्ण दगावल्यानं खळबळ उडाली आहे. यावर शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, असा दावा प्रशासनाने केला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर, शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभरात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.
तर, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापुर्वी देखील एकाच दिवशी जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. याकडे मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, रुग्णालयातील १३ रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर ३ रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. काही रुग्ण खासगी रुग्णालयामधून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल झाले होते. तर, काही रुग्णांचे वय ८० पेक्षा जास्त असल्याने वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.