भाजपच्या निर्णयावर पवारांचे विधान; म्हणाले, कुणाच्याही कोंबड्यांनी...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय खलबतं सुरु आहे. अशातच अंधेरी पोट निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. काल अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपने आज अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान, भाजपने मागणी कोणाची मान्य केली यावरून वादंग सुरू झाले आहे. यावर जोरदार शाब्दिक युद्ध राजकीय वर्तुळात सुरू झाले आहे. यावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घ्यावा, अशी माझी मागणी नव्हती. मी मागणी कशी करणार? मी फक्त भाजपला सूचवले होते. सूचवल्यानंतर त्यातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. तो सकारात्मक निर्णय आता झाला आहे. एकदा निर्णय झाल्यानंतर त्याच्या खोलात मी जात नाही. त्यामुळे आता त्यावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही, असे मत पवारांनी माध्यमांशी बोलताना मांडले.
पुढे त्यांना माध्यमांनी विचारले की, भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पण त्याचं श्रेय ते राज ठाकरे यांना देत आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही, एकदा उमदेवाराने माघार घेतल्यानंतर त्यात शंका कारणं काढण्याची गरज नाही. कारण मिमांसा करण्याची गरज नाही. पोटनिवडणूक होती. दिवंगत रमेश लटकेंच्या पत्नीला वर्ष, सव्वा वर्ष मिळणार होते. त्याबाबत भाजपकडून चांगला निर्णय आला आहे. तो कधी झाला? का झाला? हे महत्त्वाचे नाही. असे निर्णय पटकन होत नसतात. त्यासाठी ग्राऊंडवर्क करावे लागते असे त्यांनी बोलताना सांगितले.
इतर लोकांनीही माघार घेतली तर बरं होईल
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी भाजपच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. खर तर उमेदवारी अर्ज मागे घ्या हे त्यांनी सांगायची गरज नाही. जेव्हा एकच वर्षाचा कालावधी मिळत असेल. अन् त्या कुटुंबाचा सदस्य लढत असेल तर माघार घेतली पाहिजे, आता निवडणुकीत जे उभे आहेत त्या इतर लोकांनीही माघार घेतली तर बरं होईल. त्यांनी माघार घेतली तर निवडणूक होणार नाही. ज्यांनी अर्ज भरला त्यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही आवाहन करणार नाही, असे विधान त्यांनी यावेळी केले.