शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती; कारवाई होणार

शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती; कारवाई होणार

अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.
Published on

मुंबई : अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राजकीय वर्तुळात भूकंप केला आहे. याशिवाय अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान यांनी एक विधान केलं. त्या विधानात दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी भ्रष्टाचारमध्ये सापडलेला पक्ष आहे, असा आरोप केला. त्याचा मला आनंद आहे की मंत्री मंडळात काही जणांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ हे आरोप नव्हते आणि त्यांना यातून मुक्त केलं त्याबद्दल मी पंतप्रधान यांचा आभारी आहे, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे.

शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती; कारवाई होणार
अजित पवारांच्या शपथविधीवर उध्दव ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, नांदा...

आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी घेतली. ६ तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती आणि त्यात काही बदल होते. त्यात संघटनात्मक बदल करण्याचे विचार होता. पण त्या पूर्वीच पक्षातून वेगळी भूमिका घेतली आणि आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. पक्षातील काही सदस्य यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली याचे खरे चित्र लोकांच्या समोर येईल. ज्यांची नावे आली त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आमच्या सह्या घेऊन आमची भूमिका वेगळी आहे, असं मला सांगितलं आहे. हा असा प्रकार इतरांना नवीन असेल मला नवीन नाही, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

१९८० नंतर मी या पक्षाचे नेतृत्व करत होतो. तेव्हाही आमदारांचे निलंबन झाले होते. तेव्हाही मला आमदार सोडून गेले होते. आणि मी ५ आमदारांचा नेता झालो. पाच लोकांना घेऊन मी महाराष्ट्र पक्ष बांधणीसाठी आलो. १९८० मध्ये जे चित्र दिसलं ते पुन्हा आता दिसेल. माझा राज्यातील तरुण लोकांवर विश्वास आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून मला फोन येत आहेत आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी भूमिका त्यांनी मला सांगितली आहे. ममता बॅनर्जी यांचा फोन पण मला आला. घडला जो प्रकार त्याची मला चिंता नाही. उद्या कराड मध्ये जाऊन दलित समाजाचा एक मेळावा घेणार आहे आणि त्यानंतर राज्यात देशात जेवढं जाता येईल आणि लोकांना भेटता येईल अशी माझी रणनीती आहे. पक्ष बांधणी हेच माझे टार्गेट आहे आता, नव्या नेतृत्वाची पिढी आता येईल, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्ष नेता पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला याची माहिती मला तुमच्याकडून कळली. स्पीकरकडे राजीनामा दिला असेल तर माहिती नाही पण त्यावर भाष्य करून उपयोग नाही. संख्याबळ आहे का? हे मी आता सांगू शकत नाही. विरोधी पक्ष नेते यांची निवड करण्याचा अधिकार स्पीकरचा आहे. दोन-तीन दिवसात आम्ही बघू की काँग्रेस किंवा सेना किंवा राष्ट्रवादी विरोधी पक्ष नेता म्हणून कोण नेता द्यायचा. त्यानंतर ठरवून आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे मांडू.

कार्यकर्त्यांची अस्ववस्था काढायची असेल तर संघटनात्मक काम करावे लागतील. आमदार यांच्यावर काय कारवाई करायची हे पक्षातील नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. मी पदाधिकारी यांची नेमणूक केली आहे. तटकरे आणि प्रफुल पटेल यांना सांगणे आहे की जी पावले टाकली ती योग्य नाही. माझा त्यांच्यावर विश्वास राहायला नाही. ज्यांनी शपथ घेतली त्यांच्यावर कारवाईचा विचार करण्यात येईल, असा इशाराही शरद पवारांनी दिला आहे.

माझं कोणाशी काही बोलणे झाले नाही. काही लोकांनी मला फोन केला आणि आमच्या सही घेतल्या. मात्र, आमची भूमिका वेगळी आहे असे मला सांगितले. ज्यांच्या सह्या घेतल्या ते लोक संपर्क साधत आहे. त्यांना मतदारसंघाची आणि कार्यकर्त्यांची चिंता आहे. सत्तेचा फायदा होईल पण यातून १०० टक्के यश मिळते, असे नाही शेवटी पाठिंबा जनता देते, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com