Nanded Hospital : एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती...; शरद पवार म्हणाले
नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला गांभीर्याने न घेतल्यानेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अशाप्रकारच्या एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली.
यातून सरकारी यंत्रणांचे अपयश स्पष्ट होते. किमान वेळीच या दुर्दैवी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि निष्पाप रुग्णांचा जीव वाचला जाईल यासाठी ठोस पावले उचलली जावीत याकडे राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. असे शरद पवार म्हणाले.