गौतमी पाटीलचे नाव घेत शरद पवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
मुंबई : शाळा दत्तक घेतल्या जात आहेत. शाळेचा वापर खाजगीकरणासाठी हेईल. याचे उदाहरण म्हणजे एका दत्तक शाळेत गौतमी पाटील यांचा नाचाचा कार्यक्रम घेण्यात आला, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. सरकार म्हणते शाळेचे समायोजन करू. आपण महाराष्ट्रात आहोत. सावित्रीबाईंनी जिथे शाळा सुरू केल्या तिथे आपण गप्प बसलो तर लोक आपल्याला प्रश्न विचारतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
काही कार्यक्रम आपल्याला हातात घ्यायचे आहे. महिला आरक्षणावर चर्चा झाली. तो निर्णय आपण घेतला. तालुका पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी आपण निर्णय घेतला. कर्तृत्व फक्त पुरूषच दाखवू शकतात, असे नाही तर संधी मिळाली तर महिला पण करू शकतात हे तुम्ही दाखवून दिले, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.
मणिपूरसारखे उदाहरण आपण पाहतो. महिलांची धिंड काढली जाते आणि हजरी घेतली जाते, अन्याय होतो. असे दिसलं तर राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर उतरल्याच पाहिजे, अशा सूचनाही शरद पवारांनी महिला कार्यकर्त्यांना केली आहे.
रिक्त जागांची संख्या खूप जास्त आहे. पण, सरकार म्हणतं आम्ही कंत्राटी पद्धतीने भरू. सरकारी नोकरीमुळे कुटुंबाला स्वास्थ्य राहते. कंत्राटी पद्धतीने भरले गेली तर महिलांना संधी मिळणार नाही. जातींना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारला कि, १ जानेवारी ते १ मे २०२३ या कालावधीत १९५५३ महिला आणि तरूणी बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये 18 वर्षाच्या खाली 1453 होत्या. यात नोंद न झालेल्या महिला किती असतील? परिस्थिती गंभीर आहे. यावर आपण गप्प बसायचे का? असा सवालही शरद पवारांनी केला आहे.