...तर सरकारला किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा इशारा
पुणे : संघर्ष यात्रा सुरु होण्याआधीच कंत्राटी नोकरभरती रद्द करण्यात आली. सरकारला तरुणांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करता येणार नाही. तरुणांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेईन. सरकारला तरुणांकडं दुर्लक्ष करणं महागात पडेल, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. राष्ट्रवादीतर्फे आज युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी शरद पवारांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
समाजात जागृती करण्याचा आणि महाराष्ट्रातील तरुणाईच्या आशा-आकांक्षा पल्लवित करण्याचा कार्यक्रम रोहित पवार यांनी हाती घेतला आहे. 800 किलोमीटरची 45 दिवसांची ही दिंडी आहे. ही दिंडी नव्या पिढीची आहे. तिला यश येणार आहे. तुम्ही सुरुवात करायच्या आधी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा लागला. नागपूरला पोहोचेपर्यंत प्रश्न मार्गी लागले नाही तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल. सत्तेत राहायचे असेल तर युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा इशाराच शरद पवारांनी दिला आहे.
महाराष्ट्रात पुण्यातील आयटी पार्कसारखे उद्योग उभारले जाणे आवश्यक आहे. ही संघर्ष यात्रा त्याचा आग्रह धरणार असेल तर सरकारला त्याची पूर्तता करावीच लागणार आहे. युवा संघर्ष यात्रेतील प्रश्न घेऊन बैठक बोलावण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असून मी स्वतः त्यासाठी पुढाकार घेणार आहे. मुख्यमंत्री ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या हिताचा विचार करतील अशी खात्री आहे. आणि प्रश्नांची सोडवणूक नाही केली तर पुढे काय करायचे ते आपण ठरवू, असेही शरद पवारांनी सांगितले.