चंद्रकांत पाटलांवर शाईफेक! भाजप आक्रमक; राज्यभरात उग्र निदर्शने करण्याचे आदेश
चंद्रशेखर भांगे | पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. याचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात आला. परंतु, आता भाजप आक्रमक झाली असून चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना उग्र निदर्शने करण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपरीतील एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी चंद्रकांत पाटील हे काल भेट घेण्यासाठी गेले असता समता सैनिक दलाच्या मनोज बरगडे या व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केली होती. यानंतर चंद्रकांत पाटील हे चांगलेच संतापले पाहायला मिळाले होते. यावेळी ते म्हणाले होते की, आज आमच्या कार्यकर्त्यांना खुली छुट दिली असते तर केवढ्याला पडले असते. पण, ही आमची संस्कृती नाही. यावर भाजप प्रदेशध्याक्षांचे जे आदेश असतील ते अंतिम असेल. जर ते म्हंटले शांत रहा. तर कोणत्याही कार्यकर्त्यांनी निदर्शने करु नये, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले होते.
याच पार्श्वभूमीवर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना राज्यभरात आक्रमक निदर्शने करण्याचे आदेश दिले आहे. यानुसार भाजप कार्यकर्ते आज दुपारी तीन वाजता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनतर आज देखील या विधानाचे पडसाद आज सर्वत्र दिसून आले आहे. दरम्यान, पुणे दौऱ्यावर असताना पिंपरी- चिंचवड येथे भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.