अब्दुल सत्तारांचं भाजपसोबत मन रमेना? सत्तारांच्या 'त्या' विधानानं खळबळ
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदेगटातील नेते व सध्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजपसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. "अनेक मतदार संघांमध्ये फडणवीस व शिंदेंनी युती करण्याबाबत विचार करावा." असं वक्तव्य सत्तारांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे सत्तार हे भाजपसोबतच्या युतीमध्ये खुष नाहीत का असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.
नेमकं काय म्हणाले सत्तार?
"ज्या ज्या मतदार संघामध्ये माझ्या मतदारसंघासारखी परिस्थिती आहे त्या त्या मतदारसंघामध्ये युती न करता मैत्रीपुर्ण लढतीबाबत विचार केला जावा. शेवटी निवडून आल्यानंतर सत्ता स्थापन करताना आपण दिल्लीमध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सोबतच राहू. स्थानिक पातळीवर आमच्यामध्ये मैत्रीपुर्ण लढत ही झालीच पाहिजे. पण, दोन्ही पक्षांमधील जो कोणी निवडून येईल तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता राहील." असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
सत्तारांच्या विधानानं खळबळ:
अब्दुल सत्तारांनी जरी मैत्रीपुर्ण लढत असं म्हटलं असेल तरी, युती झाल्यास दोन्ही गटांतील उमेदवारांना त्याचा फायदाच होणार आहे. तरीही, अब्दुल सत्तारांनी असं विधान केल्यानं अब्दुल सत्तार हे भाजपसोबतच्या युतीमध्ये नाखुष आहेत का? असा सवाल राजकीय वर्तुळात फिरत आहे. तर, अब्दुल सत्तार हे त्यांच्या मतदारसंघातील भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत खुष नसल्याची चर्चा काहींच्या तोंडावर आहे.