Saroj Patil on Pawar Family: निवडणुकीचा पवार कुटुंबावर परिणाम होणार नाही, सरोज पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या की...
आम्ही स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ देखील पाहिला आहे. सध्याचा काळ देखील पाहतोय, पण आता सारखा काळ कधीच पाहिला नव्हता. जर पुन्हा मोदी सरकार आलं तर लोकशाही संपून जाईल. शरद पवार आमचा वटवृक्ष आहे तो भक्कम आहे. या निवडणुकीचा परिणाम आमच्या घर फुटीवर होणार नाही. आमच्या सगळ्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम कमी होणार नाही. त्यामुळे लोकांनी याची चिंता करू नये, काहीही होणार नाही. आम्ही नेहमी घराच्या बाहेर राजकीय चपला काढून येतो. आमचं कुटुंब सुसंस्कृत आहे. प्रा. एन डी पाटील देखील शरद पवार यांच्यावर कडाडून टीका करायचे.
राजकारण संपलं की सगळे ढग निघून जातील. डोळ्याला पाणी आणणे हे दुबळेपणाचे लक्षण आहे. बोलताना कसा तोल सुटतो हे कळत नाही. शरद पवार यांना बाजूला केलं की राज्य आपल्या हातात आलं हे भाजपला करायचं आहे. आंब्याचा झाडाला लोक दगड मारत असतात. शरद पवार यांच्यावर टीका होते त्याचे वाईट वाटतं, पण अजित पवार यांना लहानपणापासून ओळखते. अतिशय संवेदनशील आहेत, अजित पवार बोलता बोलता बोलले असतील असे सरोज पाटील यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याविषयी बोलताना सरोज पाटील म्हणाल्या की, माझं सुप्रिया आणि सुनेत्रा यांच्या प्रेम आहे. मात्र सुप्रिया यांनी स्वतःमध्ये प्रचंड बदल केला आहे. बाप से बेटी सवाई असं मला म्हणावं वाटतं. संसदेत अतिशय उत्तम भाषण करते. सुप्रियाताई यांचा अभ्यास प्रचंड आहे, खूप फिरते. अभ्यासू नेता लोकसभेत पाठवायचं असेल तर शहाणी लोकं सुप्रियाला निवडून देतील. अजित पवार यांच्या कामाचा धडाका प्रचंड आहे पण पाया कुणी घातला. सुनेत्रा स्वभावाने अतिशय गुणी आहे. कुटूंबात चांगल्या पद्धतीने मिसळली आहे, पण तिचा अभ्यास कमी पडणार. ते लोकांनी जाणलं तर सुप्रियाला मतं देणार.
कोल्हापुरात महाविकास आघाडीने अतिशय चांगला उमेदवार दिला आहे. निष्कलंक, जिभेवरचा तोल कधीही जात नाही. कोल्हापूरची जनता म्हणजे लय भारी. कुठे काही घडले तर ठिणगी कोल्हापुरात पडते. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेऊन ही जनता तयार झाली आहे. शाहू महाराज नक्की निवडून येतील यात शंका नाही. कोल्हापूर नक्कीच चांगला विचार करते असे सरोज पाटील यांचं वक्तव्य आहे.