मंत्रिपदासाठी कामाख्या देवीला साकडे घालणार : संतोष बांगर
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाचे आमदार व खासदारांच्या कुटुंबासह गुवाहाटीकडे प्रस्थान केले आहे. गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे शिंदे गट जात आहेत. यावेळी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिपदाच्या मागणीसाठी मी देवीकडे साकडे घालणार असल्याचे बांगर यांनी म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगल्या आहेत.
संतोष बांगर म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं अशी अनेक नेत्यांची इच्छा होती. यातीलच एक संतोष बांगर हेदेखील होते. आता मंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, की मला मंत्रिपद हवं आहे. या मागणीसाठी मी देवीकडे साकडं घालणार आहे. माझी टगेगिरी नाही, तर ही माझी स्टाईल आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अद्याप प्रलंबित आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे गटातील अनेक नाराज आमदारांचे लक्ष आहे. त्यामुळे कोणाची नाराजी दूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हिवाळी अधिवेशनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल, असे संकेत काही मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे कदाचित याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिंदे गट गुवाहाटीला जात असल्याची चर्चा आहे. चर्चा झाल्यावर हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संतोष बांगर यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.