अवकाळी पाऊस येणार म्हणजे छत्री धरायची होती का? शिरसाटांचे अजब विधान
मुंबई : स्वतः च्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना जो माणूस दुसऱ्या राज्यात प्रचाराला जातो असा माणूस राज्याचा कारभार करायाला नालायक आहे, असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला होता. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अडीच वर्षात घरात बसणारे आज मुख्यमंत्र्यांची लाज काढतायत हे दुर्दैव, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, अवकाळी पाऊस येणार म्हणजे छत्री धरायची होती का, असा सवाल शिरसाटांनी विचारला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, अडीच वर्षात घरात बसणारे आज मुख्यमंत्र्यांची लाज काढतायत हे दुर्दैव, हा मोठा विनोद आहे. अवकाळी पाऊस येणार म्हणजे छत्री धरायची होती का? पण शेतीतील काही कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी कालच पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक मंत्री आज बांधावर आहेत. एक दिवस आमचे मंत्री प्रचाराला गेले तर यांना त्रास होतो आणि हे अडीच वर्षात घरात बसले हे कोणते राजकारण? यांना ना शेतकऱ्याचा कळवळा ना आरक्षणाच्या प्रश्नावर घेणं देणं फक्त टोमणे मारणे हा तुमचा स्वभाव झाला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांचा आदर करायला शिका, असा सल्लाही दिला आहे.
काम न करता लोकं आपल्या पाठीशी आहेत हे त्यांचं स्वप्न भंग होणार आहे आणि आगामी लोकसभा विधानसभेत त्यांची जागा पहायला मिळेल. हे सरकार व्हीसीवर नाही, शेतात आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती आहे की सरकार आमच्या पाठीशी आहेत. आम्हाला आमच्या राज्याचा नावलौकिक देशात वाढवायचा आहे. चौकट तोडून आम्ही काय करू शकतो हे देशाने बघितले. तुम्ही जे राज्य चालवले हे जनतेने बघितले आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?
महाराष्ट्रात सरकार असंविधानिक आहेच. मात्र, आज जे असंविधानिक आहेत ते स्वतःची घर सोडून फिरतायत. स्वतःच घर न सांभाळता दुसऱ्या राज्यात गेलेत. एक फुल दोन हाफ कुठे गेले माहिती नाही दुसरे डेंगू झाला होता, असे टीकास्त्र उध्दव ठाकरेंनी सोडले आहे. हवामान खात्याने इशारा देऊन देखील सरकारने काय केलं? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जबाबदारी कोण घेणार? मुख्यमंत्री, पंतप्रधान, मंत्र्यांना प्रचार करायला वेळ आहे मग माझ्या शेतकऱ्यांना बघायला वेळ आहे का? असा सवालही त्यांनी केला होता.