उद्धव ठाकरे सभेला येतील, गद्दार म्हणतील, दोन-चार टोमणे मारतील आणि...; शिरसाटांची टीका
नाशिक : उद्धव ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जळगावात सरदार वल्लभभाई पटेल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. यावेळी उध्दव ठाकरे यांची सभा होणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. अशातच, संजय शिरसाटांनी उध्दव ठाकरेंच्या सभेला टोमणे सभा म्हणत टीकास्त्र सोडले आहे.
जळगावमध्ये होणारी उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमने सभा आहे. टोमण्यांच्या सभेला काहीच अर्थ नाही, उद्धव ठाकरे जळगावच्या सभेत काहीच बोलणार नाहीत. उद्धव ठाकरे सभेला येतील, आम्हाला गद्दार म्हणतील, दोन-चार टोमणे मारतील आणि निघून जातील. त्यामुळे त्यांच्या सभेला आता गर्दी जमणं कमी झाली यांची त्यांना खंत वाटते, अशी जोरदार टीका संजय शिरसाटांनी केली आहे.
तर, दहीहंडीला जाण्यापेक्षा त्यांनी घरात बसायला पाहिजे होतं. व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या, असा टोलाही शिरसाटांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कसा असतो हे आता महाराष्ट्र पाहतो आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरेंनी शिर्डीत शेतकऱ्यांच्या बांधावर जात दुष्काळाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकाही केली होती. या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे देवदर्शनाला जातात, हे काय दुष्काळ पाहायला थोडी जातात. त्यांना शेतीतले काय कळतं का, त्यानिमित्ताने थोडं फेरफटका मारतात हे काही कमी आहे का, अशी खोचक टीका शिरसाटांनी केली आहे.