संजय राऊत यांच्या अपात्रतेबाबत शिंदेगट आग्रही; शिरसाटांचा इशारा
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर टीका करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले. याविरोधात नाशिक व ठाण्यात राऊतांविरोधात गुन्हा दाखल केले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी शिरसाटांनी राऊतांचा उल्लेख पिसाळलेला कुत्रा म्हणून केला.
संजय राऊताच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्याच्यावर बोलायचं नाही. त्याच्यावर अपात्रतेची कारवाई कशी होईल हे आम्ही पाहतोय. मुख्यमंत्री यांच्यावर काय भाषा वापरतात. त्यांच्यावर गुन्हे दाखलही झालेले आहेत. याप्रकरणी राऊतांना ८ दिवसात उत्तर देऊ, असा इशाराच संजय शिरसाटांनी दिला आहे. तसेच, शिवसेनेकडून बजावण्यात येणारा व्हीप हा ५६ आमदारांसाठी असणार यात ठाकरे गटाच्या आमदारांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
विधीमंडळ कार्यालयानंतर शिवसेना भवनावर दावा करणार का, असे विचारले असता संजय शिरसाठ म्हणाले, शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. आम्ही कधीच त्याच्यावर दावा केला नाही. ज्यांना पैशाचा लोभ आहे त्यांची ती प्रॉपर्टी आहे. पक्ष किंवा ट्रस्टकडून शाखा नाहीत शिवसैनिकांमध्ये वाद होणार नाहीत, असे स्पष्ट त्यांनी केले आहे.
दरम्यान, पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट टप्प्याटप्प्याने राज्यतील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेऊ शकते. याचा प्रयत्नही दापोली व नेरुळमध्ये करण्यात आला. यावेळी शिंदे गट व ठाकरे गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही गटात संघर्ष अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.