भाजपवर मनी लाँड्रिंगचा खटला चालवायला हवा; राऊतांचा निशाणा
मुंबई : सत्ताधारी भाजपनेच देशाला भ्रष्टाचाराची वाळवी लावली आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे व्यवहार करून पैसे जमा करणारे अनेक नेते भाजपात येऊन ‘शुद्ध’ होतात. मनी लाँडरिंगचे गुन्हेगार पक्षात घेणे हे मनी लाँडरिंग गुन्हय़ात सहभागी होण्यासारखेच आहे. भाजप अशा गुन्ह्यांत सह आरोपी ठरेल! भाजपवर मनी लाँडरिंगचा खटला चालवायला हवा, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून केला आहे.
भ्रष्ट पैसा आणि भ्रष्ट पुढारी कुणाला हवेत? असा प्रश्न आता जनतेलाच पडला असेल. भ्रष्टाचार खणून काढण्याच्या बाबतीत केंद्र सरकार कसे एकांगी पद्धतीने वागते हे आता रोजच दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ‘ईडी’ व ‘सीबीआय’ आता कायमच्याच बंद व्हाव्यात. भाजप सरकारच्या मनमानीच्या पालखीचे भोई म्हणून या यंत्रणा आता काम करीत आहेत. देशातील नऊ प्रमुख विरोधी नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहून ‘ईडी, सीबीआय’ फक्त विरोधकांनाच कसे ‘लक्ष्य’ करीत आहे ते कळवले. नारायण राणे, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा, प. बंगालचे मुकुल रॉय, सुवेन्दू चौधरी असे अनेक नेते भाजपात प्रवेश करण्यापूर्वी भ्रष्ट होते. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या पुस्तिकाच भाजपने प्रसिद्ध केल्या होत्या, पण हे सर्व लोक आता भाजपात येऊन पवित्र झाले व भाजप त्यांच्याशी सुखाने नांदत आहे.
भारतीय जनता पक्षात प्रचंड प्रमाणात काळय़ा पैशांची आवक आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यवहारातून म्हणजे PMLA कायद्यानुसार ‘प्रोसिड ऑफ क्राईम’मधूनच हा पैसा त्यांच्याकडे येत आहे. मनी लाँडरिंगचा व्यवहार करणारे अनेक नेते भाजपात वाजतगाजत घेतले. म्हणजे त्या ‘प्रोसिड ऑफ क्राईम’मध्ये भाजपचे हात काळे झाले हे मान्य केले तर PMLA म्हणजे मनी लाँडरिंगविरोधी कायद्यानुसार भारतीय जनता पक्षावरच कारवाई व्हायला हवी. सत्ताधारी भाजप हेच मनी लाँडरिंगचे खरे आगर आहे. मनी लाँडरिंगचे सर्व गुन्हेगार भाजपात येतात व लगेच त्यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाया थांबवल्या जातात, हे काय फडणवीस यांना माहीत नसावे, असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.
कोकणातील ‘साई रिसॉर्ट’प्रकरणी सदानंद कदम यांना ‘ईडी’ने ते आजारी असताना उचलले, पण आय.एन.एस. विक्रांतप्रकरणी लोकांकडून गोळा केलेला पैसा गायब करणाऱ्यांपर्यंत ‘ईडी’ पोहोचली नाही व फडणवीस गृहमंत्री होताच त्यांनी ही चौकशीच बंद करून चोर-लुटारूंना सरळ ‘क्लीन चिट’ दिली. भ्रष्टाचार दडपण्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भाजप मनी लाँडरिंग राजरोस करीत आहे. ‘POC’ म्हणजे गुन्हेगारीतून आलेली माणसे व त्यांचा पैसा जिरवून ढेकर देत आहे. संपूर्ण भाजपवरच ‘मनी लाँडरिंग’चा खटला चालवायला हवा. विरोधी पक्षांच्या ज्या नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून भिंतीवर डोके आपटण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात उभे केले पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.