संजय राऊतांचं थेट संयुक्त राष्ट्राला पत्र; 20 जून 'गद्दार दिन' जाहीर करण्याची मागणी
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात बंड पुकारत भाजपसोबत सत्तेत बसले. या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजचा दिवस म्हणजेच २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, असे पत्रच संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिले आहे.
काय आहे संजय राऊतांचे पत्र?
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५२ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
या घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने यासाठी ५० खोके घेतले. त्यामुळे २० जून हा सर्व जगात गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल. २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहित खोचक सल्ला दिला होता. २१ जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा करावा यासाठी पंतप्रधानांमार्फत युनोकडे मागणी करावी, अशी मागणी दानवेंनी पत्रात केली होती.