शिवनेरीवर सामान्यांना प्रवेश नसेल तर मग दिल्लीश्वरासाठी ठेवणार का? राऊतांचा सवाल
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण राज्यभरात जल्लोषात साजरी होत आहे. अशातच, शिवनेरीवर मात्र गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवप्रेमींना शिवनेरीवर दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात येत होता. मात्र, काही व्हिआयपींना पासेस देऊन शिवनेरीवर सोडण्यात येत होते. हे पाहून माजी खासदार संभाजी छत्रपती चांगलेच संतापले व सर्वांसमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही निशाणा साधाला आहे.
शिवजयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी होती. लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र करण्यासाठीं उत्सव साजरा केला. त्यानंतर राज्यांतील शत्रूविरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच गद्दारांविरोधात लढले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांचे राजे आहेत. मात्र, नव्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांपासून जनेतला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. सामान्यांना प्रवेश त्या ठिकाणी नसेल तर मग दिल्लीश्वरासाठी ठेवणार आहात का, असा सवाल संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना केला आहे.
टोकाची चाटूगिरी सूरू आहे आणि ते आम्हाला ज्ञान देतायत ते. हजारो काश्मीरी पंडित जम्मूला येऊन का थांबले आहेत? आजही ते घरी जायला तयार नाहीत. त्यांना संरक्षण तुम्ही देऊ शकलेला नाहीत. अमित शाह यांना जर हे माहिती नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, किम जॉर्ज रिपोर्ट आला आहे. 2014 पासून ईव्हीएम हॅक करण्यात आले आहेत. एका इस्त्राईल कंपनीला यांनी काँट्रॅक्ट दिलं आहे. त्यांनी हिंडेनबर्ग वरील देखील उत्तर दिलं नाही. तसेच, माझ्याकडे पक्की माहिती आहे नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये दर ठरला. तर आमदार 50 कोटी आणि खासदार यांच्यासाठी 100 कोटी रूपये देत आहेत. त्यांनी नावं आणि चिन्ह विकत घेतलं आहे. 2 हजार कोटी रूपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यांच्या मित्र परिवारातील बिल्डर यांनी ही रक्कम दिली आहे. आता हे मुंबई महाराष्ट्र देखील विकत घेतील, असा घणाघात संजय राऊतांनी केला.