“देशाचे पंतप्रधान मोदी चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान”
शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, टोमणे-प्रतिटोमणे असे रोजच नवनवे अंक पाहायला मिळत आहेत. त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा टोलेबाजी सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या आपल्या सदरामध्ये चंद्रकांत पाटलांच्या याच विधानावरून त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.
"मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है" असं म्हणत संजय राऊत यांनी रोखठोक सदरामधून खोचक टोले लगावले आहेत. "देशाचे पंतप्रधान मोदी चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. काँग्रेसच्या काळात चमचे होते. मोदी काळात अंधभक्त आहेत. फक्त नामांतर झालं. काम तेच", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "देवकांत बरुआ यांनी इंदिरा इज इंडिया म्हटलं होतं, मोदी भक्तांनी मोदी इज इंडिया असं जाहीर केलंय. जे मोदींबरोबर नाहीत, ते देशाबरोबर नाहीत, असं टोक भक्तांनी गाठलंय", असं देखील राऊत यांनी या लेखात नमूद केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या एका विधानाचा संदर्भ घेऊन संजय राऊतांनी त्यांच्यावर आणि भाजपावर खोचक टोलेबाजी केली आहे. "महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील यांनी आता कडेलोट केला आहे. पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवत सांगितलं नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात आणि फक्त दोनच तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पाटलांची ही विधानं ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना इतकं मानसिक बळ येतं कुठून? हा संशोधनाचा विषय आहे", असा खोचक सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर स्वर्गात देवांचीही झोप उडाली असेल, असं राऊत या लेखात म्हणाले आहेत. "जे राज्य चमचे निर्माण करतात, ते चमच्यांचे बनते. त्यातून अंधभक्तांची फौज निर्माण होते. मोदी चंद्रकांत पाटलांचे देव आहेत. देवांनाही चमचे होते. पण देव झोपत नव्हते असं चमचे म्हमाले नाहीत. मोदी अखंड जागे राहतील असं जाहीर करण्यात आल्यामुळे स्वर्गात देवांचीही झोप उडाली असेल. देवांची झोप उडवण्याची ताकद चमच्यांत आणि भक्तांत आहे", असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.