पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांच्या विधानावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सिन्नर : पहाटेच्या शपथविधीवरुन गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातातवरण तापले आहे. अशातच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट लागू होणार होती ती उठली, असे विधान शरद पवार यांनी केले. यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा गदारोळ सुरु झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार येऊ नये म्हणून कोंडी केली होती. पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली व राजवट उठली. यामुळे लख्ख प्रकाश पडला. पहाटेच्या शपथविधी बाबत पवारांना माहिती होते की नाही मला माहित नाही, कोंडी फुटायला शपथविधीने मदत झाली. फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो त्यांनी कोंडी फुटायला मदत केली, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.
शरद पवार यांना समजायला 100 वर्ष लागतात असे मी म्हटलो होतो तेव्हा टीका झाली होती. बहुमत आम्ही दाखविले असते तर राज्यपालांना डोकी मोजयला 5 वर्ष लागले, असाही निशाणा त्यांनी भगत सिंह कोश्यारी आणि भाजपवर साधला आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या विधानानंतर राष्ट्रपती राजवट का लागली, त्याच्या मागे कोण होते, याचे उत्तर दिले तर सर्व कड्या उघड होतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.