Sanjay Raut : 'ते ठाकरे असतील तर मी देखील बाळासाहेबांनी घडवलेला राऊत'; संजय राऊत यांचा राज ठाकरेंवर पलटवार
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे बोलतात. बोलू द्या ना. भारतीय जनता पक्षाचा नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो. जे महाराष्ट्राची लूट करत आहेत. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हेसुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते त्या शत्रूला त्या भाषेचा वापर करावा. असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले आहे.
स्वच्छ शुद्ध तुपातली भाषा कुणासाठी वापरायची महाराष्ट्राच्या शत्रूसाठी? आम्ही चमचेगिरी करणारी लोक नाहीत. राज ठाकरे काल इथं येऊन काय बोलले त्यात मला जायचं नाही. निवडणूक आहे भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट आहे. फडणवीसांचे स्क्रिप्ट असेल बोलावं लागते. नाहीतर ईडीची तलवार आहे वर.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आम्ही अत्यंत सभ्य माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेलं आहे. माझं बरेचसं आयुष्य हे बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गेलेलं आहे. हे राज ठाकरे यांनाही माहित आहे. त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे. आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात गुंडांचे राज्य सुरु आहे, त्यावर राज ठाकरेंनी बोलावं. असं संजय राऊत म्हणाले.