अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं...; राऊतांची दमानियांच्या दाव्यावर प्रतिक्रिया
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, असा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
अंजली दमानिया यांना माहिती भाजपकडून मिळाली असेल तर त्या बोलल्या असतील. पण, अजित पवार काय असं करतील असं वाटत नाही. अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. तर, वेणूगोपाल राव यांनी उध्दव ठाकरेंकडे वेळ मागितली आहे वेळ त्यांना दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या स्वतंत्रपणे सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या देखील सभा होत आहेत. राजकीय बांधणीसंदर्भात सभा होत असून पाचोर येथे उद्धव ठाकरेंची सभा होईल. त्या ठिकाणी पुतळ्याचे अनावरण आणि सभा होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, दिल्लीमध्ये नितीश कुमार राहुल गांधी यांना भेटले. सर्व विरोधक एकत्र येतायत. भाजपला आव्हान दिलं जातंय. नितीश कुमार आणि तेजस्वी एकत्र कायम असतील. तसेच, उध्दव ठाकरे व मी कालच शरद पवार यांना भेटलो. लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्र राहिलं पाहिजे. राज्याची जनता वेगळ्या मूडमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.