विधानसभा अध्यक्षांनाच आता आयसीयुमध्ये ठेवण्याची वेळ; राऊतांचा नार्वेकरांवर निशाणा
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलेच फटकारलं आहे. आम्ही नोटीस काढल्या, आदेश काढला तरीही विधानसभा अध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही. पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष हे खडे बोल सुनवण्याच्या योग्यतेचे आहेत. ज्या गांभीर्याने संविधान घ्यायला पाहिजे त्या गांभीर्याने घेत नाही. तुम्ही सर्वोच न्यायालयाला काय नौटंकी समजलात का, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.
सो सोनार की एक लोहार की. विधानसभा अध्यक्ष यांनी आणि त्यांच्या पालकांनी शहाणपण घेतला तर बरं आहे. अन्यथा हे लोक न्यायव्यवस्था कशी पायदळी तुडवतात हे उघड होईल. आम्हाला आदेश द्यावा लागेल असे न्यायालयाने सांगितलं आहे. हे दहा पक्ष फिरून बारा गावचं पाणी पिलेले लोक आहेत. यांना पक्षांतर, घटनाबाह्य सरकार याच्याशी घेणं नाही. यांना दिल्लीच्या आदेशाने सरकार वाचवायच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
घटना पदावर बसलेल्या व्यक्तीने नीतिमत्ता आणि मर्यादा ठेवली पाहिजे. बाबासाहेबांचे संविधान हलक्यात घेऊ नका. सरकार जाण्याची वेळ आता आली आहे. जितका वेळ आयसीयुमध्ये ठेऊन वाचवायचे होते ते अध्यक्ष यांनी वाचवले आहे. आता विधानसभा अध्यक्षांना आयसीयुमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे, असे टीकास्त्र राऊतांनी सोडले आहे. सर्वांना कायदा एकच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनाला हा निर्णय लागू होईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
ही एक चपराक आहे, न्यायालयाने हातोडा विधानसभा अध्यक्ष यांच्या टाळक्यात मारला आहे. हे सरकार आता 72 तासात जाणार आहे. दिल्लीत जाऊन आदेश घेऊन येतात, योग्य वेळी योग्य निर्णय त्यांनी आम्हाला सांगू नये. तुमचा निर्णय आम्ही करु, 2024 पर्यंत पण थांबण्याची गरज नाही, असाही घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.