Sanjay Raut: "उद्धव ठाकरेंची शिवसेना छाताडावर बसलेली आहे"; संजय राऊत म्हणाले...
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आजच्या दिवशीचा मुहूर्त साधून भाजपने आज त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. यावर संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी दहा वर्षात रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुडदा पाडला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग आहे. त्यांनी आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे, देशातील जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागृत झाल्याने भाजपच्या काही अपकृत्यांमुळे त्यांनी आजचा दिवस निवडला.
शिवसेनेवर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हे भारतीय जनता पक्ष काय प्रकरण आहे आमच्यावर अशा पद्धतीने टीका करणारे. हा फुसका बार ज्याला तुम्ही म्हणताय हेच तुम्हाला कालपर्यंत महाराष्ट्रात खांद्यावर घेऊन फिरवत होते. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हीच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे भाजपच्या मनातील आणि पोटातील भीती आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रयत्न करूनही संपली जात नाही संपवली जात नाही आणि आमच्या छाताडावर बसलेली आहे या भीतीतून अशी वक्तव्य केली जात आहेत.
आज झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांस-मच्छीचा उल्लेख केला. याच मुद्द्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाचे प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 वर्ष देशावर राज्य करत आहेत, त्यांचं बहुमताचे सरकार आहे, ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी दहा वर्षात काय काम केलं भरीव, विकास यावर बोलायला हवं. 2024 ला मी काय करणार आहे यावर बोलायला हवं, पण अशा प्रकारचा कोणतही काम त्यांनी केलेलं नाही, लोकांना थूकपट्टी लावून देशाला थुकरटवाडी करण्याचं काम केलं. आमचे विरोधक मांस-मच्छी खातात म्हणून त्यांना मत देऊ नका असं वक्तव्य म्हणजे प्रधानमंत्री यांच्या प्रचाराची पातळी इतक्या खालच्या स्तरावर आणतेय आहे हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. उद्या हे अशा पद्धतीने आमचं जे सैन्य आहे त्याला सुद्धा शाकाहारी करतील. त्यांचा काय भरोसा नाही. मांस-मच्छी खाऊ नका हे आमच्या भारतीय सैन्यालाही सांगतील. त्यांचं एकमेव तेच लक्ष दिसतंयं असे संजय राऊत म्हणाले.