Sanjay Raut : “फक्त दोघांनी शपथ घेतली, म्हणजे सरकार आलं असं नाही”
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज (14 जुलै ) मुंबईत येत आहेत. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) गट व अपक्ष आमदार आणि खासदार यांना मूर्मू यांच्याबरोबर होणाऱ्या बैठक व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी द्रौपदी मुर्मूंच्या दौऱ्यात मातोश्री भेटीचा कार्यक्रम नाही असे स्पष्ट केले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यात 100हून अधिक लोक दगावले आहेत. आता राज्यपाल कुठे आहेत? राज्यात वादळ आहे. पूर आहे. पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी कॉलराने डोकंवर काढलं आहे. रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. राज्यपाल कुठे आहेत? आम्हाला ते खूप सल्ले द्यायचे. आता त्यांची खरी गरज आहे. आता त्यांनी बोललं पाहिजे. पण राज्यपाल आहेत कुठे? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला. राज्याच्या अनेक भागात कॉलराचं थैमान आहे. रुग्णालयांत गोंधळ आहे. अशा परिस्थितीत राज्यात सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली म्हणजे सरकार आलं असं होत नाही. शपथ घेऊन १२ दिवस होऊन गेले. पण सरकार स्थापन होत नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी होणार आहे. तिथे गेलेले अनेक आमदार अपात्र ठरू शकतात”, असं संजय राऊत म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत म्हणाले. "अजून काहीच सुरू झाले नाही, राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी लोक मृत्यू पडत आहेत. अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर पडलाय, राज्यपाल कुठे आहेत आता? घटनेचे पालन आता तरी राज्यपालांनी करावं, असं म्हणत संजय राऊत यांनी थेट राज्यपालांना प्रश्न विचारला आहे. तसेच, मंत्रालय ठप्प पडले आहे. शपथ घेऊन देखील कामकाज सुरू झाले नाही. मंत्री अजून का बनले नाही?", असं संजय राऊत म्हणाले.