'महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची सत्ता आणायचीय, पण...; संजय राऊत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या शिवसनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काल त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माजी मंत्री लीलाधर डाके यांची भेट घेतली. या भेटीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी असं संजय राऊत म्हणाले. शिवाय त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणायची आहे, असंही म्हटलं आहे.
लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांना एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे. डाके आणि जोशी हे कडवे शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वादळांमध्ये शिवसेनेचे पाठिशी ते ठामपणे उभे राहिले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या भेटीतून शिंदे यांना नक्कीच बोध मिळेल. ते एकनिष्ठता वगैरे सारख्या गोष्टी त्यांच्याकडून शिकतील, असं संजय राऊत म्हणाले. लीलाधर डाके, मनोहर जोशी (Manohar Joshi) तर अनेक कठीण प्रसंगात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत उभे राहिले आहेत. डाके, जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अशा कडवट, निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. एकनाथ शिंदेंनी जोशी-डाके यासारख्या शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या.
दरम्यान कोणाला मुख्यमंत्री बनायचं असतं मिळेल त्या मार्गाने. आम्हालाही महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे, पण मिळेल त्या मार्गाने नाही. राज्यात महापूर आहे. लोकं वाहून गेलेत. नुकसान झालंय. गुरं-ढोरं वाहून गेले. दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या पण मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री फिरणार असलतील तर त्यावर टीका करण्यासारखं काही नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.