फडणवीसांचे सर्वोच्च बॉस ‘सामना’ची...; राऊतांचा निशाणा
मुंबई : ‘सामना’ माझ्यावर सातत्याने टीका करतो, असा नाराजीचा सूर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सदनात काढला. फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, “आम्ही ‘सामना’ वाचत नाही.” पण त्यांचे सर्वोच्च बॉस ‘सामना’ची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्याचे लक्षण, असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सामना रोखठोकमधून संजय राऊतांनी भाजपवर घणाघात केला आहे.
पंतप्रधान मोदी हे सध्या दिल्लीत राज्याराज्यांतील ‘एनडीए’ खासदारांच्या बैठका घेत आहेत. एका बैठकीत ते म्हणाले, ‘आता फक्त माझ्या नावावर मते मागू नका. तुमच्या कामावर मते मिळवा.’ याचा अर्थ असा की, फक्त मोदी नावावर मते मिळणार नाहीत हे त्यांनी स्वीकारले आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. ‘सामना’ माझ्यावर सातत्याने टीका करतो, असा नाराजीचा सूर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सदनात काढला. तो तितकासा बरोबर नाही. फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, “आम्ही ‘सामना’ वाचत नाही.” पण त्यांचे सर्वोच्च बॉस ‘सामना’ची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्याचे लक्षण. टीकाकारांचे विचार समजून घेतले पाहिजेत. हीच खरी लोकशाही.
मोदी यांच्यावर कधीच व्यक्तिगत किंवा खालच्या पातळीवरची टीका ‘सामना’ने केली नाही. भाजपचे ‘नागडे पोपटलाल’ शिवसेना नेत्यांवर करतात तसे कमरेखालचे वार व खोटे आरोप केले नाहीत. मोदी मंत्रिमंडळातील महाराष्ट्राचे एक मंत्री नारायण राणे यांनी अविश्वास ठरावाच्या वेळी लोकसभेत केलेले भाषण मोदी यांनी ऐकायला हवे. महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणारे ते भाषण. ‘सामना’ने अशी भाषा कधी वापरली नाही. धोरणांवर टीका करणे हे वेगळे व खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे वेगळे, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.