Sanjay Raut : अशोक चव्हाण 2 वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
याच पार्श्वभूमीवर आज अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता हा पक्षप्रवेश असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपामध्ये प्रवेश करुन अशोक चव्हाण स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत. भाजपाकडून काँग्रेसचं शुद्धीकरण सुरु आहे. अशा पद्धतीने भाजपा 200 पारही जाणार नाही. अशोक चव्हाण यांनी केलेला घोटाळा मोदी नांदेडमध्ये येऊन सांगतात. मोदींनी घोटाळा करणाऱ्यांना पवित्र केलं. भाजपामध्ये घेऊन शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न. अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, शिंदे म्हणजे शिवसेना नाही आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी नाही.
अशोक चव्हाण 12च्या मुहूर्तावर 12 वाजवून घेत आहेत. अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्यासोबत जागावाटपाची चर्चा करत होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच त्यांची काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती. काल संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची चर्चा झाली. उद्धवजींनी त्यांना सांगितले तुम्ही चुकीचा निर्णय घेतला. अशोक चव्हाण 2 वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते. राज्यसभा निवडणुकीत मतविभागणी होणार नाही. असे संजय राऊत म्हणाले.