निवडणुका आल्या की यांना रडायला येतं; राऊतांचा पंतप्रधानांवर घणाघात
नाशिक : राम एकवचनी, मोदींसारखे ढोंगी नव्हते. पंतप्रधान खोटारडे नेते, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. यावेळी ते बोलत होते. गद्दारांना लवकरच धडा शिकवणार, असेही राऊतांनी म्हंटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, अयोध्येतील प्रभू रामचंद्र आपल्याला आशीर्वाद देत असतील. रामाचा आशीर्वाद फक्त शिवसेनेला मिळणार आहे. ते एकवचनी सत्य वचनी होते. मोदीसारखे ढोंगी झाले नाही. २०१४ मध्ये मोदी नाशिकमध्ये आले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देणार होते त्याचे काय झाले? आणि तेच मोदी काळाराम मंदिरात झाडू मारताना पाहिले. मोदी नाशिकमध्ये आले तेव्हा शेतकऱ्यांना अटक केली. शेतकरी नेत्यांना अटक केली अशा प्रकरचे जुलमी सरकार आहे.
अयोध्येतील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. व्रत वैकल्ये केली चादरीवर झोपत होते. देशातील ८० कोटी जनता रोज झोपते आहे. तुम्ही काय नाटक करतायं. राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा आमच्या चेहऱ्यावर आनंद होता. आणि हा माणूस रडत होता. अरे काय रडता आनंदाचा क्षण आहे. निवडणुका आल्या की रडू येते. पुलवामाची घटना घडली तेव्हा रडले नाही. हजारो महिलांवर अत्याचार झाले तेव्हा रडले नाही, असेही राऊतांनी म्हंटले आहे.
फक्त महाराष्ट्रभर नाहीतर ही शिवसेनेला आता दिल्लीपर्यंत जायचे आहे. आता देशाचे नेतृत्व आपल्याला करायचे आहे. शिवसेना फक्त एकच बाळासाहेब ठाकरे यांची. आपल्याला प्रभू रामाचा आशीर्वाद मिळाला आहे आपल्याला रामराज्य आणायचे आहे. गद्दारांचे राज्य उखडून काढायचे आहे. पन्नास फूट गाडायचे आहे पुढील शंभर वर्ष बाहेर निघाले नाही पाहिजे, असाही घणाघात संजय राऊतांनी केला आहे.