राष्ट्रवादी फोडण्याचा ‘सीझन-2’ सुरु; राऊतांचे भाजपवर टीकास्त्र, लोकशाहीची धूळधाण

राष्ट्रवादी फोडण्याचा ‘सीझन-2’ सुरु; राऊतांचे भाजपवर टीकास्त्र, लोकशाहीची धूळधाण

अजित पवार भाजपात जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र
Published on

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार 15 आमदारांसह भाजपात जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरुन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून शिंदे-फडणवीसांवर शरसंधान साधले आहे. शिवसेना फोडली हा 'सीझन-१', आता राष्ट्रवादी 'फोडण्याचा 'सीझन-२' आला आहे, अशी चर्चा जोरात आहे. फोडाफोडी म्हणजेच लोकशाही हे आता काही लोकांनी ठरवूनच टाकले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादी फोडण्याचा ‘सीझन-2’ सुरु; राऊतांचे भाजपवर टीकास्त्र, लोकशाहीची धूळधाण
महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' नागपुरात; अजित पवारांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीबाबत सीझन सुरू आहेत. शिवसेना फोडली हा ‘सीझन-1’, आता राष्ट्रवादी फोडण्याचा ‘सीझन-2’ आला आहे, अशी चर्चा जोरात आहे. फोडाफोडी म्हणजेच लोकशाही हे आता काही लोकांनी ठरवूनच टाकले आहे. हिंदुस्थानी लोकशाहीची कशी धूळधाण उडवली जात आहे ते आता रोजच दिसते. कालपर्यंत लोकांची मते विकत घेतली जात होती. आता लोकांनी मते देऊन निवडून दिलेल्या आमदार-खासदारांना सहज विकत घेण्यास आजचे सत्ताधारी उतरले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.

शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. हे अनैतिक आहे. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण? ज्यांच्यावर या ना त्या कारणाने खटले आहेत त्यांना धमकवायचे. हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावर भाजपने हल्ले सुरू केले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहाराचे हे प्रकरण. मुश्रीफ यांनी जेरीस येऊन भाजपात जावे असा एकंदरीत खटाटोप आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेइमानांचे सरदार झाले. शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अशा किती फायली कपाटात जातील ते पाहायचे. आज राज्याचे चित्र काय आहे? शिंदे सरकारचे मंत्री मंत्रालयात जात नाहीत. शिंदे यांचे चिरंजीव प्रशासनात सरळ हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मंत्रालयापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सरकार कोठे चालले आहे? ते मंत्रालयातच झोपले आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी शिंदे-फडणवीसांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com