Sanjay Raut : संदीपान भुमरेंनी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर लोटांगण घातले होते
बंडखोर आमदारांविषयी बोलताना ते म्हणाले, मुंबईतून पलायन केले तेव्हा म्हंटले हिंदुत्व अडचणीत आल्याने बाहेर पडलो. नंतर म्हंटले राष्ट्रवादी कॉंग्रेसने निधी दिला नाही म्हणून बाहेर पडलो. यानंतर काही लोक विभागात हस्तक्षेप करत असल्याने बाहेर पडलो. आणि आता यानंतर माझे नाव सांगत आहे. त्यांनी बंडखोरी का केली यासाठी त्यांनी कार्यशाळा घेतली पहिजे. तुम्ही नक्की ठरवा का बाहेर पडले, असे त्यांनी सांगितले आहे.
२०१४ साली भाजपाशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. आमचे हिंदुत्व मजबूत असतानाही भाजपानं आमच्याशी युती तोडली, तेव्हा यातले कोणीच लोक काही बोलले नाहीत.२०१९ साली याच हिंदुत्ववादी भाजपानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून आमच्यावर ही वेळ आली. तेव्हा कुठे गेले होते त्यांचे हिंदुत्व, असा सवालही राऊतांनी बंडखोर आमदारांना विचारला आहे.
संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले. तेव्हा सामना कार्यालयात येऊन त्यांनी लोटांगण घातले. व तुम्ही होतो म्हणून मी मंत्री झालो, असे म्हणाले होते. याची व्हिडीओ फुटेजही आहे. संजय राठोड यांच्यवरील संकटांमध्ये शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे ठामपणे उभे राहिले होते. असो, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. आमचे मन साफ आहे. उध्दव ठाकरे यांचे मन साफ आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
शरद पवारांमुळे शिवसेना संपत आहे, असे काही जण आरोप करत आहेत. त्यांच्या पक्षातील लोकच आमच्याकडे आले आहेत. त्यांचे नेतृत्व माननारे ही लोक होते. आणि आता आरोप करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
शिवसेना खंबीर आणि मजबूत आहे. 40 लोक गेले. यामुळे शिवसेनेला काही फरक पडला नाही. शिवसेनेचे मनोबल खचले नाही तर ते वाढलच आहे. भविष्यात निवडणुका झाल्या. तर, जनता शिवसेनेच्या मागे ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.