कोण प्रसाद लाड? ते भारतीय जनता पक्षाचे प* आहेत; संजय राऊतांचा घणाघात
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा वाद अद्यापही शमला नसून त्यात आणखी भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. यावरुन भाजपवर विरोधी पक्षांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रसाद लाड यांच्यावर घणाघात केला आहे. कोण प्रसाद लाड? ते काय कोणी इतिहासकार आहेत का, ते भारतीय जनता पक्षाचे प* आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, कोण प्रसाद लाड? ते काय कोणी इतिहासकार आहेत का, ते भारतीय जनता पक्षाचे प* आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती यांना खतम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार यांच्या पक्षाचं मुंडक छाटेल. असं वाटतंय की यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो. यांच्या कानात काहीतरी मंत्र देतात आणि हे बोलतात. यांची लायकी आहे का? महाराजांचा जन्म कुठे झाला हे अख्या जगाला माहित आहे. हे नवीन-नवीन शोध लावत आहे. यांनी इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का? हे आता महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहिणार का, अशा शब्दात त्यांनी प्रसाद लाड व भाजपवर शरसंधान साधले आहे.
'कर्नाटक नव्याने पाहूया' अशा आशयाचे पोस्टर्स नागपुरात मुख्यमंत्री शिंदे दाखल होण्यापूर्वीच लागले आहे. यावरुनही संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे सरकारला आणि महाराष्ट्राला दिलेले आव्हान आहे. मी आजच वृत्तपत्रात वाचलं. आशिष शेलार म्हणतात की, आरेला कारेने उत्तर देऊ. त्यांना सांगा कर्नाटक आतमध्ये घुसलंय. तुम्ही कधी कारे करणार. तुमच्या थोबाडवर त्यांनी पोस्टर लावलंय. चुल्लूभर पाणी में डूब जाओ, अशी तुमची अवस्था झालीय. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे.
राज्यपालांना हटविण्यासाठी भाजप नेते उदयन राजे भोसलेंच्या पत्राची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावर ते म्हणाले, यात राष्ट्रपती भवन काहीही करू शकत नाही. यावर कारवाई पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी कारवाई करावी. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या संस्थांची सध्या काय अवस्था आहे माहित आहे. महाराष्ट्राची जनता हीच ताकद आहे. उदयन राजे आणि संभाजी राजे हे आपल्या-आपल्या पद्धतीने जागरूकता तयार करत आहे. विरोधी पक्षदेखील लवकरच भूमिका जाहीर करेल. जे लोकं शिवाजी महाराज यांच्याविषयी अभद्र भाषा वापरतात, ते शिवसेनेवर काहीही बोलू शकतात. जे छत्रपतींना सोडत नाही, ते आम्हाला काय सोडणार, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.