आरएसएसकडून निष्ठा काय असते हे शिकले असते तर...; संजय राऊतांचा टोला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्र्यांनी डॉ. हेडगेवारांना अभिवादन केले. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, रेशीम बागेत जाऊन आलात आनंद आहे. या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते. जय महाराष्ट्र, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदेना ट्विटरवरुन लगावला आहे.
तर, संघ विचारांचा रेशमी कीडा हा त्यांच्या कानात वळवळत आहे. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी आणि हाफ पॅंट घालून येतील, असेही संजय राऊतांनी म्हंटले होते.
दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन पडले. या गटातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खरी शिवसेना नक्की कोणाची हा वाद सुरु असताना आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा केला आहे. यामुळे पालिका मुख्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.