कामाख्या देवीच 40 आमदारांचा न्याय करेल : संजय राऊत
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार व खासदारांनी शनिवारी गुवाहटी दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर, शिवसेना नेते संजय राऊतांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. खोके सरकारचं आणि आसामचं काय? कामाख्या देवीच 40 आमदारांचा न्याय करेल, असे टीकास्त्र राऊतांनी सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकारला देशात खोके सरकार म्हणून मान्यता मिळाली आहे. खोके सरकारचं आणि आसामचं काय? आसामचे मुख्यमंत्री मूळचे काँग्रेसचे आहेत. ते पक्षांतर करून भाजपमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदेंनीही तेच केलं. त्यामुळे दोन पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं जुळलं असेल, असा चिमटा त्यांनी एकनाथ शिंदेंना काढला आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कामाख्या देवीच्या दर्शनाला बोलावलं नाही. कारण आम्ही पक्षांतर केलं नाही. कामाख्या देवी न्याय देवता आहे. त्या 40 आमदारांचाही न्याय करतील. आम्हाला खात्री आहे कामाख्या देवी न्याय करतील, अशीही टीका राऊतांनी केली आहे.
नवी मुंबईत आसाम भवन आहे. त्यामुळे मुंबईत आसाम भवनसाठी जागा नाही. मात्र,सांस्कृतिक देवाणघेवाण झाली पाहिजे. या भवनासाठी जागा द्यायची की नाही शेवटी हा निर्णय राज्याने घ्यायचा असतो, असंही ते म्हणाले.
तर, राज्यपालांविरोधात संजय राऊतांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीने शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे. उद्धव ठाकरे यांनी तर सरकारला अल्टिमेटम दिला आहे. भाजपकडून वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहे. त्यामुळे या सर्वांविरोधात सर्वांनी एकत्र यावं, असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे भोसले, महाविकास आघाडी किंवा संभाजी ब्रिगेड ज्यांना ज्यांना महाराजांवर श्रद्धा आहे. स्वाभिमान आहे, त्या सर्वांनी या अन्यायाविरोधात एकत्र यावे. महाराजांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाने एकत्र यावे. महाराजांची विटंबना करणाऱ्यांविरोधात एकत्र यावे, असे त्यांनी म्हंटले आहे.