'राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन हा राजद्रोहासारखा गुन्हा'

'राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन हा राजद्रोहासारखा गुन्हा'

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यात वादंग माजला आहे. यावर संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून राज्यपालांवर जोरदार प्रहार केला आहे.
Published on

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यात वादंग माजला आहे. यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत असून राज्यपालांना हटविण्याची मागणी केली जात आहे. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यापालांची पाठराखण करण्यात आली. याविरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून राज्यपालांवर जोरदार प्रहार केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी या दोन लोकांनी शिवाजी राजांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे सरकार तोंड शिवून बसले. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपमानाच्या विरोधात साधा निषेध केला नाही. उलट राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा बचाव केला. असे आक्रित इंग्रजकाळातही घडले नव्हते. म्हणूनच काळ मोठा कठीण आला आहे असेच म्हणावे लागेल.

शिवरायांचा अपमान राज्यपालांनी पहिल्यांदाच केला नाही, याआधी तो वारंवार केला आहे. राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, ही मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. अशा राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे हा राजद्रोहासारखा गुन्हा आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांची केलेली निंदा हा जर राजद्रोहासारखा गुन्हा ठरत असेल तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची निंदा हा राजद्रोहच म्हणायला हवा, असे राऊतांना म्हंटले आहे.

महाराष्ट्रात शिवराय हे श्रद्धास्थान आहे व जगासाठी ते आदर्श वीरपुरुष आहेत. शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे. मागे एका प्रकरणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान झाला म्हणून संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना ‘सांगली बंद’ केले, पण आज छत्रपती शिवरायांचा भाजपकृत अपमान होऊनही ते गप्प आहेत. या प्रश्नी सर्व शिवप्रेमी संस्था व संघटनांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र बंद’चीच हाक द्यायला हवी.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे, प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावर इस्लामी व अरब राष्ट्रांनी निषेध करताच भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचे मात्र समर्थन केले जाते! बदनामी करणाऱ्यांचा केसही वाकडा झाला नाही. ते त्यांच्या पक्षात आणि पदावर कायम आहेत! महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचे कारस्थान विषप्रयोगाप्रमाणे तडीस जात आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com