कोल्हापूर : शिवसेनेला (Shivsena) बदनाम करण्यासाठी व समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच भाजपने कारस्थान केले. व त्यांनी संभाजीराजेंचा (Sambhaji Raje) गैरवापर केला. पण, शाहू राजेंनीच (Shahu Raje) हा मुखवटाच काढला. आता तरी भाजपने (BJP) शहाणे होऊन कपटी कारस्थाने बंद करावी, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात शिवसंपर्क अभियानात बोलत होते.
ईडी, सीबीआय त्यांच्या हातातील खेळणी : राऊत
संजय राऊत म्हणाले की, भाषण करण्याचा मक्ता केवळ महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत काही लोकांनीच घेतला आहे. आम्ही काय बोललो तर आमच्यावर थेट देशद्रोहाचा आरोप करण्यात येतो. त्यांच्याविरोधात काही बोलले तर लगेचच ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स मागे लागतात. हे त्यांच्या हातातील खेळणी, अशी टीका केंद्रीय तपास संस्थावर त्यांनी केली आहे. आम्ही घाबरत नाही. शिवसेना झुकणार नाही, महाराष्ट्र वाकणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
'केस दापोलीची अन् धाडी मुंबईत, केवळ सुडाच्या कारवाया सुरु आहेत'
मंत्री अनिल परब यांच्या घरावर पडलेल्या धाडीविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, अनिल परब यांच्या घरी ईडीचे लोक गेले. कारण दापोलीतील एका रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जाते. हे रिसॉर्ट अजून सुरुही झालेले नाही. तुम्ही आर्थिक गुन्हे शाोधणारी लोक आहेत. पण, सांडपाण्याचा निचरा होत नाही म्हणून मुंबईत धाडी टाकत आहेत. अशा प्रकारे या सुडाच्या कारवाया संपूर्ण शिवसेनेवर सुरु आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सुरु आहे. ते राज्य विस्कळीत कारायचे आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने भाजपच्या पोटात दुखते, असाही निशाणा त्यांनी साधला.
भाजपने संभाजीराजेंचा गैरवापर केला
शाहू राजेंचे संजय राऊत यांनी आभार मानले. ते पुढे म्हमाले, सहाव्या जागेचा वाद सुरु झालेल्या वादाचा संभ्रम शाहू राजेंनी दूर केला. महाराष्ट्रात शिवसेनेला बदनाम करण्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने सुरु केलेल्या कारस्थानाचा मुखवटा कोल्हापूरात शाहू राजेंनी स्वतः काढला. यावरून कोल्हापूरच्या मातीत सत्य आणि प्रामाणिक पणाची कास सोडलेली नाही हे दिसते. शाहू राजेंनी आजही ते धरुन ठेवलेले असल्याचे दाखवून दिले. संभाजीराजेंच्या सहाव्या जागेबद्दल सुरु असलेला वाद निरर्थक असल्याचे सिध्द झाले आहे. शिवसेनेने कायमच छत्रपती घराण्याचा मान राखलेला आहे. शाहू राजेंचे वक्तव्य हा आम्हाला अंबाबाईने दिलेला प्रसाद आहे असे मानतो, असे ते म्हणाले आहेत. आता तरी भाजपने शहाणे होऊन कपटी कारस्थाने बंद करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजीराजेंची शिवसेनेने कोंडी केली. आता कोंडी तुमचीच झाली आहे. आम्ही त्यांना सन्मानाने बोलवले. पण, भाजपने कारस्थान केले. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी व समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच त्यांनी संभाजीराजेंचा गैरवापर केला. पण, शाहू राजेंनीच हा मुखवटाच काढला.
'सोमय्यांनी आणखी 200 कोटींचा दावा ठोकावा'
भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्यावर 100 कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावर त्यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. माझ्यावर 100 कोटीचा दावा टाकला आहे. आणखी 200 कोटीचा दावा दाखल करा. मी तुम्हाला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अंगावर याल तर सोडणार नाही. ही बाळसाहेबांची शिवसेना आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.